Sunday, October 26, 2014

अभिषेक पंकज सिंह

नाव – अभिषेक पंकज सिंह
शिक्षण – ७ वी
वय – १४ वर्षे
व्यसन – नाही
पत्ता – शिवसेना कार्यालयाजवळ, तुलसीपाडा, गावदेवीरोड, भांडुप पश्चिम
       व्यवहारिक बाबतीत हुशार असलेला अभिषेक अभ्यासात मात्र कासव आहे. त्याला अभ्यासाचा खूप कंटाळा आहे. घरचे सतत त्याला अभ्यासावरून बोलत असतात, मारत असतात. पण आपल्या चांगल्या भविष्यासाठी घरचे आपल्याला सतत अभ्यास करायला सांगतात हे मात्र अभिषेकला नीटसे कळत नव्हते. त्यामुळे घरच्यांच्या बोलण्याचा त्याला फार राग येत असे. घरचे सतत टाकून बोलतात त्यामुळे घरच्यांबद्दल चीड निर्माण झाली होती. या त्रासाला कंटाळून त्याने घरातून काढता पाय घेतला. रेल्वेने प्रवास करत तो सी.एस.टी स्थानकात आला. स्थानकात फिरत असताना समतोल कार्यकर्त्यां माधवीताई यांच्या संपर्कात आला.

       माधवी ताईने त्याची चौकशी केल्यावर त्याने “मी भांडूपचा आहे, मी माझ्या मित्रांना शोधतो आहे,” असे सांगितले. तेव्हा माधवीताईने तो मुंबईचाच रहिवासी असल्याने त्याला लोकलमध्ये बसवून थेट घरी जाण्यास सांगितले. पण थोड्यावेळाने माधवी ताईंना अभिषेक पुन्हा मालगाड्यांच्या फलाटांवर फिरताना आढळला. त्यामुळे माधवी ताईंनी पुन्हा त्याची सविस्तर चौकशी केली. तेव्हा त्याने मी मित्रांसोबत आलेला नसून मी घरी न सांगता आलेलो आहे. मला आई अभ्यासावरून सतत बोलत असते, त्यामुळे मी घर सोडून आलो आहे असे सांगतिले. तेव्हा शेल्टरला येण्यासाठी माधवी ताईंनी त्याला समजावून सांगितले. पण अभिषेक शेल्टरला येण्यास तयार नव्हता. अभिषेकला समजाऊन त्याला विश्वासात घेण्याची गरज होती आणि प्लॅटफॉर्मवरील मुलांचा विश्वास बसेल अशी व्यक्ती म्हणजे रेल्वे पोलीस. त्यामुळे अभिषेकला तेथील पोलिसांकडे नेण्यात आले. पोलिसांनी अभिषेकला ‘समतोल’ संस्थेविषयी सविस्तर माहीती देऊन आमच्याकडे जाण्यास सुचवले. तिथे जाण्यातच त्याचे भले आहे हे त्याला समजाऊन सांगितले. तेव्हा अभिषेक माधवीताईंसोबत शेल्टरला येण्यास तयार झाला. त्यामुळे पोलिसांची आम्हांला कधीकधी अशाप्रकारे अप्रत्यक्षरित्या मदत होते असे म्हणावे लागेल. अभिषेकला शेल्टरमधून काही दिवसांनी बालगृहात नेले. बालगृहाचे वातावरण पाहून त्याला एकदम रडू कोसळले. माधवीताईंकडे सरळ त्याने “मी इथून पुढे घरी न सांगता कधीही बाहेर एकटा पडणार नाही. घरी जाऊन नीट अभ्यास करेन, घरच्यांचे ऐकन” असे सांगून इथे मला ठेवू नका असा विनवण्या करू लागला. सुरूवातीला माधवताईंनी घरच्यांचा संपर्क क्रमांक विचारल्यावर न देणाऱ्या अभिषेकने बालगृहाच्या वातावरणाला घाबरून मात्र त्याने वडीलांचा संपर्क क्रमांक दिला. त्याच्या वडीलांशी संपर्क करून अभिषेक बालगृहात असल्याची कल्पना त्याच्या वडीलांना दिली. काही दिवसांनी अभिषेकचे वडील अभिषेकला घरी घेऊन गेले. समतोल संस्थेचे त्यांनी मनापासून आभार मानले. अभिषेकसारख्या दिशाहीन झालेल्या मुलांसाठीच समतोल काम करते. त्यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा समतोलला नेहमीच असते.

अल्ताफ अजीत शेख

नाव – अल्ताफ अजीत शेख
वय – ९ वर्षे
शिक्षण – २ री
संपर्क तारीख – १७.२.२०१४
पत्ता – भागलपूर, वृंदा मंदीर, युपी
       युपीला राहणारा अल्ताफ आपल्या आईवडिलांसोबत राहत होता. सुरूवातीला वडील कमवत असत परंतु त्यांच्या डोळ्याला मार लागून तो निकामी झाल्याने त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद झाले. अचानक आलेल्या या दुर्दैवी फेऱ्याने त्यांच्यावर आभाळच कोसळले होते. घरातील कर्ते अधू झाल्याने घरातील प्रत्येकालाच अधू झाल्यासारखे वाटत होते. कारण कमावणारी ती एकच व्यक्ती होती आणि खाणारी ४ तोंड होती. त्यामुळे आता पुढे आयुष्याची गुजराण कशी करावी हा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा होता. सहज ज्याच्यातून पैसा मिळेल असे काम म्हणजे भीक मागणे, असे काम जे लहान मोठी सगळेच माणसे करू शकतात. त्यामुळे त्यांनी भीक मागून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यास सुरूवात केली. हळूहळू कुटुंबातील सर्वच जण भीक मागून राहू लागले.
       अल्ताफची आई हिंदू आहे. परंतु दुसरे वडील मुस्लीम असल्याने त्यांनी मुस्लिम पद्धतीने मुलांना वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला. अल्ताफचे आधीचे आकाश नाव बदलून त्यांनी अल्ताफ ठेवले. शिवाय मुस्लिम शिक्षण देण्यासाठी त्याला मदरसामध्ये पाठवण्यात येऊ लागले. अल्ताफला मदरशामधील शिक्षण आवडत नव्हते. नाईलाजाने तो मदरशात जात होता. आपल्यासोबत अशा घटना का घडत आहेत हे त्यालाही नीटसे कळत नव्हते. आपण आपल्या मनाविरूद्ध भीक मागत आहोत, न पटणारे शिक्षण घेत आहोत बस्स! एवढेच त्याला कळत होते. इथून पुढे आपण मदरशात जायचे नाही हा विचार त्याने मनाशी पक्का केला. त्यामुळे एक दिवस संधी पाहून अल्ताफ मदरशातून पळाला. तेथे त्याच्या आईवडिलांनीही त्याच्यासाठी शोधमोहिम सुरु केली होती. रेल्वेतून प्रवास करत तो सी.एस.टी स्थानकात येऊन पोहचला.
       आपण पळालो खरे, पण पुढे काय करायचे हे ९ वर्षाच्या अल्ताफला कळत नव्हते. सी.एस.टी स्थानकात इकडेतिकडे भटकण्यात तो वेळ घालवत होता. त्याचे नशीब बलवत्तर म्हणून सी.एस.टी स्थानकात समतोल संस्थेच्या कार्यकर्त्या सौ. रूचिता जाधव यांना तो भेटला. रेल्वे प्लॅटफॉर्मवर भीक मागत फिरत असताना रचिता ताईंनी त्याची चौकशी केली. सुरूवातीला त्याने घाबरून, “आई सोडून गेल्याने मी माझ्या आईला शोधायला आलो आहे.” असे सांगितले. पण तो खोटे बोलत आहे हे रुचिता ताईने ओळखले. तेव्हा ताईने त्याला मुंबई सारख्या शहरात स्टेशनवर, रस्त्यावर भटकणाऱ्या लहान मुलांवर कशापद्धतीने अत्याचार केले जातात हे सांगितले. समतोलच्या ठाणे येथील शेल्टरमध्ये तो सुरक्षित राहू शकतो याची जाणीव त्याला करून दिली. तेव्हा ताईबद्दल त्याच्या मनात विश्वास निर्माण झाला. परिणामी, अल्ताफ शेल्टरमध्ये येण्यास तयार झाला.
       ठाणे येथील शेल्टरमध्ये सुरुवातीला अल्ताफचे मन रमत नव्हते. त्याने तिथूनही २/३ वेळेस पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे पळून जाण्याचे त्याचे सर्वच प्रयत्न असफल ठरले. प्रत्येकवेळी समतोलच्या कार्यकर्त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला शेल्टरमध्ये परत आणले. शेल्टरमधील वातावरण त्याच्यासाठी कसे सुरक्षित आहे हे त्याला पटवून दिले. त्याच्यासारख्या इतर मुलांमध्ये अल्ताफ कसा मिसळेल यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. हळूहळू तो मुलांमध्ये मिसळू लागला. तेथील वातावरण त्याला आवडू लागले. नित्यनियमाने होणारी प्रार्थना त्याला आवडू लागली. त्या प्रार्थनाने त्याच्या मनास शांती मिळू लागली. त्याला पोलीस बनण्याची इच्छा आहे आणि इथे आल्यावर टिव्हीवरील कार्यक्रम पाहून पोलीस होण्याची इच्छा अधिक तीव्र झाली आहे असे तो सांगतो. अल्ताफला शिकण्याची देखील इच्छा आहे. काही दिवसांनी त्याने सांगितलेल्या पत्त्यावर त्याला सुखरूप घरी सोडण्यात आले. आपल्या हरवलेल्या मुलाला पाहून त्याचे आईवडील खूश झाले. अर्थात, अल्ताफच्या आईवडीलांना त्यांचा हरवलेला मुलगा पुन्हा भेटवून देणे हेच ‘समतोल’चे यश आहे.
       अल्ताफ सारख्या अनेक भरकटलेल्या मुलांना पुन्हा त्यांच्या आयुष्याचा आनंद मिळवून देणे यासाठी समतोल नेहमीच प्रयत्नात असते. पण या सदैव चालणाऱ्या कामाला आपल्या सहकार्याची देखील अपेक्षा आहे.

अर्जुन नरेश गुप्ता

नाव – अर्जुन नरेश गुप्ता
वय - १३ वर्षे
धर्म - हिंदू
शिक्षण -
पत्ता - मानखुर्द रिमांड होम, कुर्ला
स्टेशनवरील कालावधी – ३ वर्षे
व्यसन - सिगारेट, व्हाटनर,
किती वेळा घर सोडले - २ ते ३ वेळा
संपर्क तारीख - ९.०५.१३
वेळ - ११.१३ मि.
परतीची तारीख - १६.०५.१४
संपर्क ते शिबीर माहीती -
       घरापासून दुरावलेल्या, दिशाहीन अवस्थेत रेल्वेस्टेशनवर भटकत असलेल्या मुलांना शोधून त्यांना त्यांचे घर मिळवून देणे, त्यांच्या भरकटलेल्या दिशांना योग्य वाट मिळवून देणे हेच समतोलचे मुख्य उद्दिष्ट आहे. ०९.०५.१४ रोजी अर्जुन सी.एस.टी स्थानकात प्लॅटफॉर्मवर भटकत असताना आढळला. समतोल कार्यकर्ती रुचिताताई यांच्या नजरेत हा मुलगा आला. थोडावेळ निरीक्षण केल्यावर हा मुलगा स्टेशनपरिसरातच राहत असावा अशी रुचिताताईची खात्री झाली. ताईने आपुलकीने त्यांची विचारपूस करून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. पण घरातून पळून आलेला अर्जुनने त्याच्यासाठी अनोखळी असणाऱ्या रूचिताताईकडून दूर जाण्याचा प्रयत्न केला. मागील ३ वर्षापासूनचा प्लॅटफॉर्मवर राहण्याचा दांडगा अनुभव असलेला अर्जुन रुचिता ताईंना अगदी सहज बोलण्यात गुंतणारा नव्हता. पण रूचीता ताईंनीही त्याचा पाठलाग सोडला नाही. प्राथमिक चौकशीत त्याने आपले नाव अर्जुन सांगितले. या ताई आपल्याला प्रश्न का विचारत आहेत? त्यांच्यापासून आपल्याला हानी तर नाही ना ? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात घोळू लागले. त्याची ती अवस्था पाहून त्याला आपुलकीने जवळ घेत समतोल संस्थेविषयी समजावून सांगितले. तेव्हा थोड्याफार प्रमाणात का होईना, त्याला रुचिताताईंविषयी विश्वास निर्माण झाला. त्यामुळे तिथून त्याला ठाणा शेल्टरला आणणे सोपे झाले.
       शेल्टरमध्ये त्याची शारिरीक स्वच्छता करून त्याला खाऊ-पिऊ घालण्यात आले. आपल्यासारखीच इतर मुले पाहून त्याला थोडा धीर आला. नाईलाजाने का होईना पण आता काही दिवस तरी आपल्याला इथेच राहवे लागेल हे अर्जुनने ओळखले होते. त्यामुळे काही वेळाने तो स्वत:हून मुलांमध्ये मिसळला. मुलांमध्ये मिसळल्यावर त्याच्याशी संवाद साधणे आम्हांला सोपे झाले. कारण इतर मुलांपेक्षा अर्जुनचा प्लॅटफॉर्मवरचा प्रवास हा एक नाही दोन तर तब्बल ३ वर्षाचा होता. परिणामी, प्लॅटफॉर्मच त्याचे घर- आयुष्य होते. ते जीवन कितीही त्रासदायक असले तरी तो ते जगत होता, अनुभवत होता. त्याच्यासाठी ते स्वच्छंदी आयुष्य प्रिय होते. त्यामुळे त्याला त्या आयुष्यापासून परावृत्त करणे, त्याला योग्य दिशा दाखवणे हे आमचे जिकरीचे काम होते. काही दिवस त्याच्यासोबत घालवल्यावर लक्षात आले की तो शांत स्वभावाचा आहे. त्यामुळे त्याच्या नकळत त्याच्याकडून कौटुंबिक पार्श्वभूमी घेण्यास सुरुवात केली. थोडक्यात त्याचे समुपदेशन करण्यात आले. तेव्हा त्याच्या आयुष्यातील घटना उलघडू लागल्या.
       अर्जुन स्टेशनवर मौज म्हणून राहत नव्हता. त्याच्यावर दुर्दैवाने ती वेळ आली होती. कुटुंबात निर्माण झालेल्या परिस्थितीने त्याच्यावर ती वेळ आणली होती. आर्थिक ओढाताणीत त्याचे कुटुंब दैनंदिन गुजराण करत होते. राहते घरदेखील भाड्याचे होते. त्यात त्याची आई दुसऱ्यांदा गर्भवती राहिली होती. पण गर्भारपणातच तिचे दुर्दैवी निधन झाले. त्यामुळे लहान वयातच अर्जुन आईच्या मायेला पोरका झाला होता. या घटनेला ३ वर्षे उलटून गेली.अर्जुनकडे वडीलांचे फारसे लक्ष नव्हते. काही दिवसांनी तेही घरातून निघून गेले ते कायमचेच. घरी परत आलेच नाहीत. घर भाड्याचे असल्यामुळे फार काळ तिथे थांबणे अर्जुनला शक्य नव्हते. त्यामुळे त्याला नाईलाजाने ते घर सोडावे लागले. रस्त्यावर राहण्यापेक्षा त्याने स्टेशनवर राहण्याचा विचार केला. निदान तिथे पावसापाण्याच्या वेळेस डोक्यावर छप्पर तरी असते. पोटाची भूक भागवण्यासाठी भंगार वेचण्याचे काम त्याने सुरु केले. त्यातून थोडेफार पैसे त्याला मिळत होते. स्टेशनवर ३ वर्षे गर्दुल्यांच्या सहवासामुळे त्यालाही नशा करण्याची सवय जडली. त्यामुळे वडापाव खाऊन पोटाची खळगी भरणे व उरलेल्या पैशाने नशा करणे हे अर्जुनचे दैनंदिन आयुष्य बनले. अर्थात, असे आयुष्य घडण्यात त्याची काहीही चूक नव्हती. निर्माण झालेल्या परिस्थितीने अर्जुनला घडवले. त्याचे कुटुंबच त्याच्याजवळ नव्हते. एवढ्या लहान वयात मुंबईसारख्या शहरात तो एकटा स्टेशनवर राहत होता. रात्री कधीतरी रिक्षात झोपणे व सकाळी भंगार वेचण्याचे काम करणे. हा त्याच्या जीवनाचा भाग होता. मानखूर्द, कुर्ला, सी.एस.टी स्थानकात भंगार गोळा करणे, भीक मागणे हे नित्याचे होते. एकदा मानकूर पोलिसांनी त्याची ही अवस्था पाहून त्याला बालगृहात दाखल केले होते. पण तिथूनही तो काही दिवसाने पळाला. स्टेशन परिसरात फिरत असताना समतोल कार्यकर्त्याना तो सापडला. आता समतोलच्या शेल्टरमध्ये चांगल्या लोकांच्या सहवासात आल्याने त्याच्या वाईट सवयींपासून तो परावृत्त होत आहे. अर्जुनमधील छुपे गुण आता बाहेर येत आहेत. तालबद्धरित्या नाचणे, चित्रकला यांसारख्या विषयात तो मग्न होऊन काम करतो. हळूहळू त्याला आपल्या कौशल्याची जाणीव होत आहे. अर्थात, समतोलच्या सहकार्याची त्याला साथ आहे.

बिलाल जमाल अंसारी (खान)

नाव – बिलाल जमाल अंसारी (खान)
वय – १३ वर्षे
शिक्षण – ६ वी
संपर्क तारीख – २१.२.२०१४
पत्ता - शांती नगर भिवंडी, गोसीया मझीदच्या मागे, गाव - बस्ती, जिल्हा - युपी
       आज गावी जायचेच असा विचार करून बिलालने घरात प्रवेश केला. आईकडून त्याने २० रू. रूपयांची मागणी केली. पण आईला बिलालने गावी जाऊ नये असे वाटत होते त्यामुळे तिने पैसे देण्यास नकार दिला. खूप विनवण्या करूनही बिलाल आईपुढे तग धरू शकला नाही. पण क्षणाक्षणाला त्याचा रागाचा पारा मात्र चढत होता. आई आपल्याला मनासारखे वागू देत याची त्याला चीड येत होती. आपण काम करतो, त्याचे पैसेही आई घेते. पण बिलालला आपली आई आर्थिक ओढाताणीने ग्रासली आहे हे त्याला कळत नव्हते. वडील सतत दारूच्या नशेत धुंद असतात. त्यामुळे बिलालची आई घरीच मोती ओवणे, कटींग यांसारखी कामे आणून करत असे. त्यावर ती आपला संसार चालवत होती. बिलालला या सर्व गोष्टी माहीत असूनही तो न समजल्यासारखा वागत होता.
       त्याला फक्त गावी जाऊन मजा करायची होती. त्यामुळे १३ वर्षे वय असलेल्या बिलालने आईने गावी जाण्यासाठी २० रू. दिले नाहीत म्हणून रागाने घर सोडले. त्याला भिवंडीतील घरापेक्षा गावात राहणे जास्त आवडत होते. त्यामुळे सतत आईजवळ “मला गावी नेऊन सोड, तिथेच शाळेत घाल” असे तो सांगत असे. परंतु आई-वडिलांना त्याचे गावी जाणे फारसे पसंद नव्हते. बिलाल भिवंडीत एका किराणा मालाच्या दुकानात काम करत असे. महिनाकाठी त्याला ३०००/- मिळत असत. बिलाल शाळेत न जाता कामावर जात असे. यापूर्वी २/३ वेळेस बिलाल घरातून पळाला होता. परंतु दोनएक दिवसात तो पुन्हा घरी आला होता. त्यामुळे यावेळेस घरातून पळाल्यावर त्याच्या पालकांनी कोणत्याही प्रकारची हालचाल केली नाही. मुलाला जाऊन महिना झाला तरी त्यांनी त्याची चौकशी केली नाही. पालकांच्या मते, बिलालला घरातून पळून जाण्याची सवयच जडली आहे त्यामुळे तो पुन्हा घरी परत येईल या आशेवरच वाट पाहत राहिले. शिवाय वडील नेहमी दारूच्या नशेत धुंद असल्यामुळे त्यांना बिलालच्या घरी असण्याबद्दल किंवा नसण्याबद्दल काहीच वाटत नाही, कुठल्याही प्रकारची खंत नाही. त्यामुळे बिलालला घरातून एक महिना झाला तरी त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देखील केली नव्हती.
       घरातून पळाल्यानंतर काय करावे हा यक्ष प्रश्न त्याच्यासमोर होता. कारण गावी जायचे तर हातात पैसे नव्हते. पैशाशिवाय त्याला खातापिताही येत नव्हते. शेवटी बिलालने त्याच्या दुकानाच्या शेटकडून गावच्या प्रवासासाठी ५००/- रू. घेतले. परंतु गावी जाणारी गाडी कोणती हे त्याला माहीत नसल्यामुळे तो चुकीच्या रेल्वे गाडीत बसला. त्या रेल्वेतून तो बिहारला पोहचला. तिथे पोहचल्यावर त्याच्या लक्षात आले आपण गावी न पोहचता चुकीच्या ठिकाणी पोहचलो आहोत. तिथून परत त्याने रेल्वे पकडली व सी.एस.टी स्थानकात दाखल झाला. सी.एस.टी स्थानकात एका अनोखळी व्यक्तीसोबत फिरताना बिलाल समतोलच्या कार्यकर्त्या रूचिता जाधव यांना सापडला. बिलाल सोबत बोलण्याचा प्रयत्न केल्यावर तिच्या लक्षात आले ज्या व्यक्तीसोबत तो फिरतोय ती व्यक्ती त्याच्यासाठी अनोखळी आहे.
       झाले असे की, सी.एस.टी स्थानकात एका व्यक्तीने बिलालला एकटं भटकताना पाहून त्याला जेवायला दिले. एक जोडी कपडे दिले. त्यानंतर “आपण पिच्चरला जाऊ” असे त्याने सांगितले. अर्थात, त्या माणसाचा हेतू वाईट होता हे नक्की. त्याच्यापासून आपणास धोका आहे हे बिलालने ओळखले. त्यामुळे बिलाल पिच्चरला न जाता पुन्हा सी.एस.टी स्थानकात येऊन बसला. त्याच दरम्यान कार्यकर्त्या रूचिता जाधव यांना तो सापडला. त्याची चौकशी करून त्याला शेल्टरमध्ये येण्यास समजवण्यात आले. त्याच दरम्यान समतोलचा कॅम्प चालू होता. तेव्हा त्याला कॅम्पमध्येच न्यावे असे ठरवण्यात आले. सुरूवातीला त्याने कॅम्पमध्ये येण्यास नकार दिला. कॅम्पमध्ये आल्यावर तेथे राहण्यासही नकार दिला. तिथून त्याने पळ काढला. पण काही वेळाने पुन्हा कॅम्पमध्ये तो स्वत:हून आला. सुरूवातीला बिलाल कॅम्पमध्ये कुणाशीच बोलत नव्हता. त्याला शिक्षणाची देखील आवड नसल्याचे समजले. आई घरी कटींग, प्रेसींग, मोती ओवणे यांसारखा जो जोडधंदा करते त्यात तिला मदत करायची असे त्याचे म्हणणे आहे. पण समतोलमध्ये मात्र त्याला सर्वांमध्ये मिळून मिसळून राहण्याची सवय लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. कॅम्पमध्ये येण्यास नकार देणारा बिलाल थोड्या दिवसांनी मात्र कॅम्पच्या वातारणात मिसळू लागला. अभ्यासाला कंटाळा बिलाल खेळात मात्र हुशार आहे. कॅम्पमध्ये कॅरम व इतर खेळ खेळण्यास त्याला आवडतात. कॅम्प संपल्यानंतर मात्र त्याला घरी जाण्याची इच्छा आहे. अर्थात समतोल बिलालची काळजी घेऊन त्याला योग्य दिशा दाखवून घरी सुखरूप सुपूर्त करेल.

रविंद्र रामहरस गुप्ता

नाव – रविंद्र रामहरस गुप्ता
शिक्षण – ६ वी
वय – १२ वर्षे
व्यसन – नाही
संपर्क तारीख – १९.०४.१४
पत्ता – साई सावली चाळ, हनुमान नगर, रोड नं. ३४, वागळे ईस्टेट, ठाणे
       रविंद्रला घरात राहण्यापेक्षा मित्रांसोबत बाहेर फिरणेच फार आवडते. १२ वर्षांच्या रविंद्रला आपल्या कुटुंबापेक्षा मित्रपरिवार फार प्रिय आहे. त्यामुळे घरात न सांगता रविंद्र मित्रांसोबत सतत बाहेर भटकायला जात असतो. बाहेर फिरणे ही रविंद्रसाठी एक नशाच जडली आहे. फिरण्याची ही नशा त्याला इतकी घातक ठरली की, त्याच्या आईचे अंतीम दर्शनही त्याला घेता आले नाही.
       रविंद्रचे वडील पाचएक महिन्यांपूर्वीच वारले. त्या दु:खाने त्याच्या आईने जाळून घेण्याचा प्रयत्न केला. औषधोपचारासाठी ती इस्पितळात असते. त्यामुळे घरी फक्त रविंद्रचे दोन भाऊ असे तिघच जण राहत असत. आई-वडील घरात नसल्यामुळे रविंद्रला बाहेर फिरण्याची संधी नेहमीच मिळत असे. तो स्वत:च्या मर्जीने घरात वागायला लागला होता. १७ वर्षाचा मोठा भाऊ काहीतरी काम करून उदरनिर्वाह करत असे. त्याला आपल्या लहान भावांची काळजी होती. पण रविंद्रला मात्र आपल्या भावांविषयी प्रेम नाही असेच त्याच्या वागणुकीवरून वाटत राहीले. कारण रविंद्र सुरूवातीपासून समतोल कार्यकर्त्यांपासून ते पोलिसांपर्यंत सर्वांना खोटी देत होता. स्वत:च्या माहीतीतील त्याने फक्त स्वत:चे नाव खरे सांगितले. रविंद्र घरातून बाहेर पडल्यापासून त्याच्या भावाने त्याला शोधण्यास सुरूवात केली होती. पोलिस स्टेशनला तक्रार देऊन ठेवली होती. पण रविंद्र मात्र सी.एस.टी स्थानकात आपल्या मित्रांसोबत मौजमजेसाठी भटकत होता. मित्रांसोबत मौजमजा करून रात्री उशिरापर्यंत घरी जाणे हा त्याचा दैनंदिन कार्यक्रम झाला होता. रविंद्रला ना स्वत:च्या भविष्याची चिंता होती ना स्वत:च्या कुटुंबाची. मित्रपरिवार त्याच्यासाठी सर्वस्व होते. योग्य मार्गदर्शनाअभावी, अयोग्य पालनपोषणामुळे रविंद्रच्या आयुष्याची दिशा भरकट चालली होती. त्यातच एक दिवस सी.एस.टी स्थानकात फिरत असताना रविंद्रवर समतोलच्या कार्यकर्त्या रूचिता जाधव यांची नजर पडली.
       रूचिता ताईने त्याची विचारपूस करून त्याची समजूत घालून त्याला बालगृहात नेऊन ठेवले. कुटुंबियांचा संपर्क क्रमांक देण्याबद्दल ताईने त्याला समजावून पाहिले पण पत्ता न सांगण्याच्या निर्धारापुढे रुचिता ताई व पोलिस दोघेही हतबल झाले. सुदैवाने त्याने स्वत:चे नाव मात्र खरे सांगितले. त्यामुळे बालगृहात रविंद्र आहे हे त्याच्या भावाला शोधणे सोपे झाले. परंतु रविंद्रच्या दुर्दैवाने ज्या दिवशी रविंद्र घरातून पळाला त्याच दिवशी त्याचे आईचे निधन झाले. रात्री उशिरापर्यंत रविंद्रची वाट पाहत त्याच्या आईचा देह ठेवण्यात आला होता. परंतु तो घरी न आल्यामुळे शेवटी नाईलाजाने त्याच्या भावाने आईचे अंतीम संस्कार केले. पण आपल्या आईचे निधन झाले याचे मात्र रविंद्रला काहीही वाटत नव्हते. जर का त्याने रुचिताताईंना किंवा पोलिसांना स्वत:चा पत्ता किंवा संपर्क क्रमांक दिला असता तर कदाचित त्याला आपल्या आईचे अंतीम दर्शन झाले असते. पण त्याच्या स्वार्थी वृत्तीमुळे तो कुटुंबापासून देखील दूर जात होता. पण या गोष्टींपेक्षा त्याला फिरणे, मौजमजा करणे अधिक पसंतीचे आहे.
       रविंद्रची काळजी त्याच्या मोठ्या भावाला आहे. त्यामुळे त्याचा शोध घेत तो भटकत होता. त्याची शोधमोहीम सी.एस.टी स्थानकात येऊन थांबली. तिथे त्याला समजले रविंद्र बालगृहात आहे. त्याने तडक जाऊन आपल्या रविंद्रला तिथून घरी आणले. बालगृहात आपल्या भावाची भेट झाल्यानंतरही रविंद्रला आनंद झालेला दिसत नव्हता. रविंद्रसारख्या मुलांना योग्य मार्गदर्शनाची, आपुलकीची व मायेच्या प्रेमाची गरज असते. अशा भरकटलेल्या मुलांना योग्य दिशा मिळवून देण्याचे, त्यांच्या कुटुंबाशी संवाद घडवून आणण्याचे काम समतोल करते.